पुणे : सोमेश्वर कारखान्याला ‘व्हीएसआय’चा राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने कार्यक्षेत्रातील सभासदांना कारखान्याच्या विविध उत्पादनांची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर तीनशे सभासदांनी उसाची मोळी गव्हाणीत टाकण्यापासून ते साखर तयार होऊन गोदामात येईपर्यंतची प्रक्रिया समजून घेतली. तसेच त्यांना कारखाना, शिक्षणसंस्था यांच्या प्रगतीची माहिती देण्यात आली.
सुरुवातीला सभासदांना वजनकाटा, पाचट वजावट याची माहिती दिली. त्यानंतर गव्हाणी, ऊसतोडणी यंत्राद्वारे तोडलेला ऊस खाली करण्यासाठी उभारलेली स्वतंत्र गव्हाण यांसह बगॅस, मळी बाहेर काढून रस कसा तयार होतो आणि त्यात गंधक, चुना याचे मिश्रण कसे केले जाते हे दाखविण्यात आले. शेवटी रसापासून तयार झालेली गरम आणि ताजी साखर खाण्याचा आनंद शेतकऱ्यांनी घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी मळीपासून अल्कोहोलनिर्मिती आणि बगॅसवर आधारीत सहवीजनिर्मिती पाहून माती परीक्षणाचीही माहिती घेतली.
‘सोमेश्वर’चे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून सभासदांना कारखाना पाहण्यासाठी निमंत्रित केले होते. कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी स्वागत केले. ऋषिकेश गायकवाड, प्रदीप परकाळे, बापूराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, अनंत तांबे, शैलेश रासकर, संतोष कोंढाळकर, सिद्धार्थ गीते, प्रवीण भोसले, संजय गाडेकर, ह. मा. जगताप, ताराचंद शेंडकर, तानाजी भापकर, अनिल गायकवाड, महेश शेंडकर, शिवाजी शेंडकर, माऊली केंजळे आदी शेतकरी उपस्थित होते.

















