पुणे : राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली ऊस बिलातून पंधरा रुपये प्रति टन कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पोंदेवाडी- रोडेवाडी फाटा (ता. आंबेगाव) येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन निर्णयाची होळी करण्यात आली. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक आहे. निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात जाईल, असा इशारा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.
यावेळी बांगर म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला असताना त्यांच्याच खिशातून पैसे काढून घेऊन ते पुन्हा शेतकऱ्यांना देणे हे अन्याय करणारे, चुकीचे आहे. खरेतर आमदार आणि मंत्र्यांनी आपले किमान पाच महिन्यांचे मानधन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. ऊस बिलातून कपातीविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. यावेळी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष तुकाराम गावडे, गणेश दौंड, गणेश पोखरकर, पंकज पोखरकर, राहुल पाचारणे, पंकज गावडे, संदीप वाळुंज, बबन लांडगे, नितीन पाचारणे, घेरभाऊ जांभळे, बबन टाकळकर, पांडुरंग राहींज, वसंत आरगडे, चंद्रकांत सहित, युवराज टाकळकर, नाथा वाळुंज, विकास गायकवाड आदी सहभागी झाले होते.