पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या चालू असलेल्या २५ व्या ऊस गळीत हंगामामध्ये एका दिवशी कारखान्याच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. मंगळवारी (दि. २) एकाच दिवशी ६४०० मे. टन उसाचे गाळप करून कारखान्याने हा नवा विक्रम साध्य केला आहे. चालू गळीत हंगामामध्ये सुमारे ७ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी कारखान्याची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, असे कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी माहिती दिली.
भाग्यश्री पाटील म्हणाल्या कि, कारखान्याचा चालू गळीत हंगामात मंगळवार अखेर १,८९,५८२ मे. टन उसाचे गाळप करण्यात आले आहे, ज्यातून १,४०,३६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. आजचा साखर उतारा १०.६० टक्के असून, सध्या सरासरी साखर उतारा ९.९५ टक्के आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० मे. टन असली तरी, सध्या ५६०० ते ५९०० मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे, असे सांगितले. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आज अखेर ७०,१०,४११ युनिट वीज एक्सपोर्ट करण्यात आली आहे. तसेच, इथेनॉलचे आज अखेर १६,४०,११० लिटर उत्पादन झाले आहे. याशिवाय, कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत यांसारखे उपपदार्थ निर्माण प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत, असे भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले.
एका दिवशी ६४०० मे. टन ऊस गाळप करून उच्च कामगिरी केल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस पुरवठा करणारे शेतकरी, वाहतूकदार, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अॅड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.

















