पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधकांच्या बाजूने गटनिहाय संभाव्य उमेदवारांमध्ये तिकीट वाटपाची कसरत सुरू आहे. मात्र, नेते मंडळींनी प्रचाराच्या माध्यमातून रान तापविण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव येथे प्रचाराचा प्रारंभ करण्याचे नियोजन आहे. विरोधी नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे सांगवी गावातून सोमवारी प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी गावोगावी गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी १३ ते २१ जून असे आठच दिवस दिले आहेत. तर उमेदवारांनी माघार घेण्यासाठी २९ मे ते १२ जून असे पंधरा दिवस दिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व विरोधकांचे अधिकृत पॅनेल अद्याप जाहीर झाले नाही. मात्र, विरोधी गटाचे संभाव्य उमेदवार मतदारांच्या घरोघरी जात आहेत. त्यामध्ये माळेगाव गटातून संभाव्य उमेदवार रंजन तावरे, रमेश गोफणे, संग्राम काटे यांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. सत्ताधारी गटात अजित पवार राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या प्रचाराला वेग देण्यासाठी सोमवारी प्रचार शुभारंभाची सभा घेणार आहेत. माळेगाव कारखान्याची निवडणूक ही तालुकास्तरावर काम करणाऱ्या नेतेमंडळींच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जाते.