पुणे : राज्य सहकारी प्राधिकरणाने तातडीने छत्रपती कारखान्याच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या संचालक मंडळाला बाजूला करत पृथ्वीराज जाचक यांच्याशी जुळवून घेतले. जाचक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभा करून पूर्वीच्या संचालक मंडळाला अजित पवार यांनी कौशल्याने या निवडणुकीपासून दूर ठेवले. आता पवार सोबत असल्याने पूर्वीच्या संचालक मंडळाच्या चुकांवर पांघरूण घालून जाचक यांना छत्रपती कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर काढून नफ्यामध्ये चालवून दाखवावा लागणार आहे. त्यासाठी पवार यांची मदत उपयुक्त ठरेल असे सभासद शेतकऱ्यांचे मत आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २५ एप्रिल २०१५ रोजी झाली होती. दरम्यान मागील महिन्यात जाचक यांनी कारखान्याचे नियम व सहकार कायदा यानुसार मतदार याद्या केल्या जाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, मतदार याद्या सहकार कायद्यानुसार झाल्या नाहीत. जाणूनबुजून मतदार याद्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याची त्यांची भावना होती. कारखाना निवडणूक बिनविरोधचे प्रयत्न सुरू असताना कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी जाचक यांच्या पॅनेल विरोधात दंड थोपटले. सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊनसुद्धा घोलप यांच्या उमेदवारांना मिळालेली मते लक्षणीय आहे. दरम्यान, कारखान्यावर सध्या १७३ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती अद्यापही अशक्त आहे. येणाऱ्या काळामध्ये माळेगाव व सोमेश्वर कारखान्याच्या तुलनेत दरासाठी जाचक यांच्या नेतृत्वाखाली कशी स्पर्धा करतो, याकडे संपूर्ण सभासदांचे लक्ष लागून राहणार आहे.