पुणे : राजगड सहकारी साखर कारखान्यात साखर उत्पादनासह डिस्टलरी, वीज निर्मिती, सीएनजी या प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी ४६७.७६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या हमीसाठी राज्यमंत्री मंडळाकडे शिफारस केली होती. या विनंतीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने कर्जहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती भक्कम होणार आहे. राजगड कारखान्याचे भागभांडवल सभासद १३,६५८ आहेत. तर ५,००० च्या दरम्यान शेतकरी ऊस उत्पादन करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कारखाना बंद असल्याने तालुक्यात ऊस उत्पादनाच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, आता चित्र पालटेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर आधुनिक यंत्रसामुग्री विकत घेण्याचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे, उपाध्यक्ष पोपटराव सुके व संचालक मंडळाने घेतला आहे. ही आधुनिक यंत्रसामुग्री कारखान्यात बसवल्यानंतर ऊस गाळप क्षमता दुपटीपेक्षा वाढणार आहे. कारखान्यात ऊस गाळप क्षमता प्रतिदिन ३,५०० मॅट्रिक टन होणार आहे. तर वीजनिर्मिती प्रकल्पात प्रतिदिन १२ मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. भविष्यात कारखान्याला प्रतिदिन ५ मेगावॅट विजेची गरज असून उर्वरित ७ मेगावॅट विजेची विक्री महापारेषणला केली जाणार आहे. त्यामुळे वीज निर्मिती प्रकल्पामधून प्रतिदिन ७ मेगावॅट विजेची चालू बाजारभावाप्रमाणे रक्कम कारखान्याला मिळणार आहे. डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी होणार असून यातून प्रतिदिन ६०,००० लिटरचे उत्पादन होणार आहे. तसेच सीएनजी प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर प्रतिदिन ५ टन सीएनजीची निर्मिती होणार आहे.