पुणे : भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्यासाठी अध्यक्ष तथा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली यांच्या मार्फत ४६७ कोटी रुपये इतके कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या रक्कमेतून दैनंदिन ३५०० टन गाळप क्षमतेचा नूतन कारखाना व डिस्टिलरी प्रकल्प यांची उभारणी करण्यात येणार आहे. १२ मेगाव्हॅट सहवीज निर्मिती प्रकल्प व सीएनजी गॅस प्रकल्प तयार करण्याचा अध्यक्ष व संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढावी यासाठी ऊस लागवड विकास कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसार करण्यासाठीच्या प्रचार रथाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष थोपटे यांच्या हस्ते शुक्रवारी भोर येथे करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक के. डी. सोनवणे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, माजी उपसभापती रोहन बाठे, भगवान भांडे, माऊली पांगारकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी थोपटे म्हणाले की, कारखान्याला पुरेसा ऊस उपलब्ध होणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक सर्व शेतकरी सभासदांसाठी कारखान्याच्या माध्यमातून राजगड ऊस लागवड योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत ऊस सागवडीविषयीची माहिती दिली जाईल. रोपवाटिकेमार्फत योग्य जातीचे निकोप रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना लागणारी खते, औषधेही वेळोवेळी जागेवर पोहोच केली जाणार आहेत. विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.