पुणे : हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर २०११ पासून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक, बँकेचे अवसायक व विद्यमान संचालक मंडळ यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले नाही. त्यामुळे संस्थेचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत पोहचला आहे. त्याच्या कामकाजातील गंभीर गैरव्यवहार, मनमानी व बेकायदेशीर निर्णयांची चौकशी करावी अशी मागणी ‘यशवंत बचाव कृती समिती’ने केली आहे. याबाबच कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे.
यशवंत कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याबाबत निवेदन दिले. सचिव लोकेश कानकाटे आणि सदस्य राजेंद्र चौधरी आदींच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याच्या आर्थिक दिवाळखोरीस जबाबदार व्यक्तींना जबाबदार धरून, कायद्याच्या चौकटीत राहून, सभासदांचे हित जपले जावे व कारखान्याला नवसंजीवनी मिळावी, ही आमची प्राथमिक मागणी आहे. कारखान्याबाबत संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात दाखल असून रिट पिटीशन क्र. ५२७०/२०२५ अंतर्गत सुनावणी सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेला बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन पुरावे व चौकशी अहवालांच्या आधारे कठोर कारवाई करावी. कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान, तसेच बिनधास्त आर्थिक निर्णय यांची चौकशी करावी आणि संबंधीतांवर कारवाई व्हावी.