पुणे : सोमेश्वर साखर कारखान्यामधील अपहाराच्या ५४ लाखांची झाली वसुली

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या टाइम ऑफीसद्वारे ५४ लाख २९ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे द्विस्तरीय चौकशीत निष्पन्न झाले होते. कारखान्याने वसुलीसाठी नेमलेल्या संस्थेस करांसह ५४ लाख ४७ हजार रुपयांची वसुली करण्यात यश मिळाले आहे. आता दोषींवर काय कारवाई होणार आणि निर्दोषांना कधी सेवेत रुजू केले जाणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. गैरहजर असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नावापुढे हजेरी दाखवून परस्पर पैसे लाटण्याचा प्रकार सोमेश्वर कारखान्याच्या टाइम ऑफीसद्वारे होत असल्याचा प्रकार उजेडात आला होता. यानंतर संचालक मंडळाने कठोर पाऊल उचलत टाइम ऑफिसच्या सर्व सहा जणांना आणि कंत्राटदारास निलंबित करत द्विस्तरीय चौकशी केली.

मेहता शहा चार्टर्ड अकौंटंट कंपनीने आठ वर्ष कालावधीतील कारभाराची तपासणी करत ५४ लाख २९ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निश्चित केले. विधिज्ञ अॅड. मिलिंद पवार यांच्या समितीने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांच्यावर तर अपहाराचा ठपका रूपचंद साळुंखे याच्यावर ठेवला. अन्य चौघे व कंत्राटदार यांनी कुठलाही अपहार केला नसल्याचे निष्पन्न झाले होते. यावर नुकतीच कारखान्याने सहकार कायद्यान्वये कायदेशीर कारवाईसाठी व वसुलीसाठी अॅड. मंगेश चव्हाण समिती नियुक्त केली होती. समितीने सातही जणांना म्हणणे मांडण्याची संधी देत त्यांचे व्यवहार तपासले. यानंतर अपहार केलेल्या रूपचंद साळुंखे याच्याकडून अपहाराची रक्कम भरून घेतली. वसुलीचे सभासदांमधून स्वागत होत आहे, मात्र आता दोन दोषींवर निलंबनाची कारवाई करणार की गुन्हे दाखल करणार? तसेच निर्दोष असलेले विलास निकम, दीपक भोसले, सुरेश होळकर व बनकर यांना रुजू करून न्याय कधी देणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here