पुणे : संत तुकाराम कारखान्याच्या हंगामाची सांगता, यंदा तीन लाख टन ऊस गाळप

पुणे : कासारसाई-दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने हंगामात एकूण ३ लाख ९७३.८३० मे. टन ऊस गाळप करून ३ लाख ९ हजार ६७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले. कारखान्याला सरासरी साखर उतारा ११.५६ टक्के मिळाला. यासोबतच सहवीज निर्मिती प्रकल्पातून २,३७,११,२०० युनिट वीज निर्मिती करण्यात आली. त्यापैकी १,४२,३०,०३० युनिट वीज महावितरण कंपनीस देण्यात आली. तसेच ४८,३६,५१४ लिटर रेक्टिफाईड स्पिरीट आणि ४१,५३,४१९ लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली. कारखान्याने गळीत हंगामात उत्कृष्ट कामगिरी नोंदवत यशस्वी सांगता केली असे त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या आगामी हंगामाच्या तयारीबाबत कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी सांगितले की, कार्यक्षेत्रात ३२१९.५८ हेक्टर उसाची नोंद झाली असून त्यामध्ये १६४८.७६ हेक्टर खोडवा व १५७०.८२ हेक्टर नवीन लागवडीचा समावेश आहे. हेक्टरी उत्पादन वाढीसाठी व्हीएसआय तसेच पाडेगाव संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक माहिती दिली जात आहे. यावेळी कामगार व उत्कृष्ट कामगिरी करणार्या कंत्राटदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक धैर्यशील ढमाले, धोंडिबा भोंडवे, राजेंद्र कुडले, दत्तात्रय उभे, प्र. सचिव मोहन काळोखे, चीफ इंजिनिअर रणजीतसिंह जगदाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here