पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत ऊस लागवड हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्रात ऊस लागवडीसंदर्भात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर केले. त्यानुसार शेतकऱ्यांना ऊस बेणे, खते उधारीवर देण्यासह ठिबकसाठी अनुदान देण्यात येणार आहे. हंगामामध्ये कमी कालावधीत जादा उत्पन्न देणारे को. ८६०३२ या बेण्यास प्राधान्य देऊन इतर जाती को. व्हीएसआय – १८१२१ व आडसाली, पूर्वहंगामाकरिता को. एम. ०२६५ उसाच्या लागवडीकरिता बेणे उधारीवर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली.
अध्यक्ष नवले म्हणाले की, शेतकऱ्यांना संशोधन केंद्रावर प्रशिक्षणासाठी ५० टक्के फी कारखान्यामार्फत भरून पाठविण्याची व्यवस्था व इतर सुविधा कारखान्यामार्फत करण्याचे धोरण कारखान्याने हाती घेतलेले आहे. ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन करण्यासाठी एकरी ५००० रुपये अनुदान देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आला आहे. तर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस संशोधन केंद्र बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान योजना राबविली आहे. त्यासाठी उत्सुक शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणी कारखान्याच्या शेतकी ऑफिसमध्ये करावी. जास्तीत जास्त ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना शिफारशीप्रमाणे चांगल्या प्रतीचे बेणे उधारीवर पोहोच करणे, उच्च प्रतीचे, मूलभूत ऊस बेणे खासगी व कारखाना साईटवरील नर्सरीमधून शेतकऱ्यांना दिले जाईल.