पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्याची नवी योजना जाहीर केली आहे. यामुळे ऊस उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी वाढेल आणि पाणी, तसेच खतांची बचत होईल. ही योजना ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यातील करारामुळे शक्य झाली आहे. सभासदांनी ९००० रुपये कारखान्याच्या लेखा परिक्षण विभागाकडे जमा करावेत आणि पावती ऊस विकास विभागाकडे नोंदवावी. ऊस लागवडीसाठी ड्रिप इरिगेशनचा वापर बंधनकारक आहे.
या योजनेसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, राज्य साखर संघ, मुंबई आणि साखर कारखाने एकत्र काम करणार आहेत. यासंदर्भातील कराराचा मसुदा व्हीएसआयने तयार केला आहे. या योजनेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा खर्च प्रति हेक्टर २५ हजार रुपये आहे. ही योजना फक्त ६०० सभासदांसाठी असून, सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै आहे. प्रथम पैसे भरून सहभाग नोंदविणाऱ्या सभासदांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास रामचंद्र गावडे यांनी सभासदांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी सभासदांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा. या योजनेद्वारे सभासदांनी ऊस उत्पादन वाढवून कारखान्याच्या ऊस गाळप वाढीसाठी सहकार्य करावे, अशी विनंती संचालक मंडळाने केली आहे.