पुणे : छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आयोटी तंत्रज्ञानाने ‘स्मार्ट फार्मिंग’

पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयोटी या तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक स्मार्ट फार्मिंग उपकरण वरदान ठरत आहे. लासुर्णे (ता. इंदापूर) शेतकऱ्यांच्या ऊस शेतीमध्ये आयोटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आधारित अत्याधुनिक स्मार्ट फार्मिंग उपकरण बसवले आहे. या उपकरणात १२ प्रकारच्या सेन्सरद्वारे सभासदांना पाणी व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोग- कीटक नियंत्रण आणि मातीच्या गुणवत्तेची माहिती मिळते. यामुळे शेतीचे नियोजन अधिक कार्यक्षम, खर्चात बचत होत आहे. या तंत्रज्ञानावरील उपकरणाने शेतीत क्रांती घडवली आहे, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृ्थ्वीराज जाचक यांनी आगामी काळामध्ये जास्तीत जास्त सभासदांना यात सहभागी करून घेऊन हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे सांगितले.

आतापर्यंत ६० सभासदांनी योजनेत सहभाग घेतला आहे. सध्या २३ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे उपकरण बसवण्यात आले आहे. याबाबत, ऊस विकास अधिकारी विकास टेंगले यांनी सांगितले की, या उपकरणाद्वारे सभासद मोबाईलवरून शेताची सद्यस्थिती कोठूनही पाहू शकतात. जमिनीतील ओलावा, मातीचा प्रकार, हवामानानुसार पाण्याची गरज आणि झाडांची अवस्था यांचे नियोजन या यंत्राद्वारे शक्य होते. हवामान बदलानुसार रोग आणि कीटकांच्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळते. त्यानुसार प्रतिबंधात्मक फवारणीचे संदेश मिळतात. त्यामुळे खत आणि रासायनिक खर्च नियंत्रणात राहतो. उपकरणाद्वारे सभासदांना शेतात किती पाऊस पडला, किती पाऊस अपेक्षित आहे, वाऱ्याची दिशा आणि वेग याची माहिती मिळते. पुढील २४ तास आणि १५ दिवसांचा हवामान अंदाज उपलब्ध होतो. यासाठी सभासदांनी ९००० रुपये कारखान्याच्या लेखा परीक्षण विभागाकडे जमा करावे आणि पावती ऊस विकास विभागाकडे नोंदवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here