पुणे : शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी ‘पंचसूत्री तंत्र’ वापरण्याचा मृदा शास्त्रज्ञांचा सल्ला

पुणे : सध्या जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी होत असल्याने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अनिवार्य बनले आहे. यासाठी ३० टक्के सेंद्रिय, ५० टक्के रासायनिक आणि २० टक्के जैविक खते या प्रमाणात खत व्यवस्थापन केल्यास जमिनीचे सुपीकत्व टिकून राहते व ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी ‘पंचसूत्री तंत्रा’चा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य आहे, असे मत नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी व्यक्त केले. यादव यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या आरोग्यविषयक समस्यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांना स्वतःपुरते विषमुक्त अन्न तयार करण्याचे आवाहन केले.

योगेश यादव म्हणाले, माती परीक्षण करून जमिनीतील पोषकद्रव्यांची स्थिती समजून घेणे, हा पंचसूत्रीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. उत्कृष्ट उत्पादनासाठी सीओ ८६०३२, सीओ २६५ तसेच सुधारित वाणांची निवड करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय लागवडीतील व्यवस्थापन, आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ शक्य आहे. हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे सर्वात प्रभावी ठरते. शेतकऱ्यांनी घरच्या घरी परसबाग उभारून सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून भाजीपाला पिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना सर्वतोपरी तांत्रिक मदत करण्यास तत्पर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here