पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सल्ल्याने ऊस लागण धोरण जाहीर केले आहे. कारखान्याचा आडसाली लागण हंगाम १ जुलैपासून सुरू होणार आहे, तर पूर्व- हंगामी सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर, सुरू हंगाम १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान होईल. तर अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याचे हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवड धोरण जाहीर झाले आहे. त्याची अंमलबजावणी १ जूनसून करण्यात येणार असून, कारखान्यामार्फत ‘दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०’ ही महत्त्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याने २ ते ३ जुलैपर्यंत लागण नोंदी बंद राहणार आहेत. ४ ते १४ जुलैपर्यंत लागण नोंदी ज्या त्या तारखेस घेणे चालू राहील. १५ जुलैपर्यंत लागण नोंदी जास्त आल्यास त्याचा ड्रॉ काढण्यात येणार आहे असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या सर्व जातींच्या खोडवा उसाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. रोप लागण ज्या दिवशी शेतात केली जाईल, त्या दिवशीचीच लागण तारीख नोंद घेतली जाईल. रोप लागणीस प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. हार्वेस्टर ऊस तोडणीला प्राधान्य देण्यात आले आहे असे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे १ जून पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी असे आवाहन कारखान्याने केले आहे.