पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य शिबिर झाले. यामध्ये ५८७ स्त्री- पुरूष मजुरांनी सहभाग नोंदविला. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच हेमंत गायकवाड होते. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात ३४६ रुग्णांची नियमित तपासणी तर ४७ रुग्णांची ईसीजी तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, ८४ रुग्णांचे हिमोग्लोबिन, ९६ रुग्णाची शुगर व ब्लडप्रेशर, १४ रुग्णांच्या अन्य तपासण्या केल्या.
यावेळी ऊसतोड मजुरांच्या मुलांचे लसीकरण करण्यासह गर्भवतींची माहिती संकलित करण्यात आली.
ऊसतोड मजूर महिला दररोज ओझी उचलण्याचे काम करतात. त्यामुळे गर्भाशयाखालील स्नायू कमकुवत होऊन युटेरस प्रोलॅप्सच्या आजाराची सुरुवात होऊ शकते. याबाबत डॉ. मनोज खोमणे व डॉ. राहुल चव्हाण यांच्या पुढाकाराने ऊसतोड मजूर महिलांचे सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती डॉ. ज्ञानदीप रासगे यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानदीप राजगे यांनी प्रास्ताविक केले. शेती अधिकारी बापूराव गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. संग्राम कोकरे यांनी आभार मानले. ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, योगेश पाटील, तानाजी सोरटे, अशोक जगताप, प्रभाकर जगताप, मुकादम बाजीराव सपकाळ, डॉ. कर्णवीर शिंदे, डॉ. प्रज्ञा खोमणे, गणेश कदम, वनिता सोरटे, परवेज मुलाणी आदी उपस्थित होते.

















