पुणे : गेल्या कित्येक महिन्यांपासून सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि स्थानिक व्यावसायिकांत वारंवार बैठका होत आहेत. मात्र, यावर तोडगा निघालेला नाही. कारखान्याने सहकार्याची भावना ठेवून पुनर्वसनाचा प्रस्ताव दिल्यानंतरही व्यावसायिकांनी तो मान्य करण्यास नकार दिला आहे. कारखान्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. परिसरात शिक्षण संस्था, रहिवासी वसाहती वाढल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. कारखाना परिसरात हंगाम काळात वारंवार वाहतूक कोंडी होते. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाड्यांना रस्ते अपुरे पडत असल्याने लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. त्यामुळे कारखान्याच्या मालकीच्या जागेवरील भाडेकरूंचे वर्तन कारखान्याच्या हिता विरोधात होत असल्याने व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली आहे.
कारखाना कार्यस्थळावर परगावाहून आलेल्या तसेच काही स्थानिकांना व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेकांनी या जागांवर टपऱ्या, शेड्स उभारून व्यवसाय सुरू केला. कालांतराने हे व्यवसाय वाढले. कारखाना प्रशासनाने भाडेकरूंशी चर्चा करून पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सर्व भाडेकरूंनी कारखान्यास सहकार्य करावे, असे सार्वजनिक आवाहन केले. मात्र, काही भाडेकरूंनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत सोमेश्वर परिसरातील दुकान लाइन काढण्यासाठी सभासदांनी परवानगी दिली आहे. तर स्थानिक व्यावसायिकांनी लहान गाळ्यांमध्ये पुनर्वसन केल्यास व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. सद्य:स्थितीतील किमान निम्मी जागा व्यवसायासाठी देण्यात यावी, अशी मागणी आहे.