पुणे : करंजे (ता. बारामती) येथील ग्रामस्थ आणि ऊस उत्पादक सभासदांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. त्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबे रोजगारापासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. करंजेतील युवकांना कारखान्यात नोकरी न देण्याचा आणि काही घरांतील अनेक व्यक्तींना नोकरीवर ठेवण्याचा भेदभाव केल्याचा आरोपही त्यांनी केला. सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांच्यासोबत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान संचालक आनंदराव होळकर यांनी गावाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
सरपंच हुंबरे, माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे, संताजी गायकवाड, माउली केंजळे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, अॅड. बाळासाहेब गायकवाड, प्रताप गायकवाड, सुनील मोकाशी, नंदकुमार मोकाशी, अनिल हुंबरे, माजी उपप्राचार्य एस. एस. गायकवाड, प्रकाश हुंबरे, प्रशांत जाधव, प्रसाद सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले. उपोषणाला करंजेपूलचे माजी सरपंच वैभव गायकवाड, मुरुमचे उपसरपंच सोमनाथ सोनवणे यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तर उपोषणस्थळाकडे कारखाना संचालक मंडळ आणि प्रशासनाने पाठ फिरविली आहे. याबाबत उपोषणकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.