पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगामातच प्रतिटन ३१७३ रुपये इतकी एफआरपी दिलेली आहे. आता कारखान्याने प्रतिटन ३४०० रुपये इतका अंतिम दर नुकताच निश्चित केला. उर्वरीत २२७ रुपये प्रतीटनापैकी एफआरपी हंगामातच अदा केलेली आहे. उर्वरीत २२७ रुपये प्रतिटनांमधून सोमेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी प्रतिटन एक रुपया कपात केली जाणार आहे. आता प्रतिटन २२६ रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. याशिवाय कारखान्याकडील रुपांतरीत ठेव, विस्तारीकरण ठेव, डिस्टिलरी विस्तारीकरण ठेव अशा तीन परतीच्या ठेवींवरील व्याजही दिवाळीच्या निमित्ताने अदा करण्यात आले आहे. या व्याजापोटी चार कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
कारखान्याने दिलेल्या या अंतिम दरानुसार, आता अनुदानासह आडसाली उसाला प्रतिटन ३४०० रुपये, पूर्वहंगामी उसाला प्रतिटन ३४७५ रुपये आणि खोडवा व सुरू उसाला ३५५० रुपये इतका सर्वोच्च दर मिळाला आहे. पूर्वहंगामी उसासाठी प्रतिटन ७५ रुपये आणि खोडवा व सुरू हंगामाच्या उसासाठी प्रतिटन १५० रुपये प्रोत्साहन अनुदान दिले आहे. त्यानुसार ७६ हजार टन आडसाली उसास ३४७५ रुपये तसेच ४७ हजार टन सुरू उसापोटी व ३ लाख १२ हजार टन खोडव्यापोटी ३५५० रुपये प्रतिटन असा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनधारकांसाठी ३२०० रुपये अंतिम दर जाहीर केला आहे. त्यांनाही ३१७३ रुपये अदा केले होते. आता उर्वरीत प्रतिटन २६ रुपये दिले आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली.