पुणे : सांगली-कोल्हापूरच्या सक्षम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखानादेखील सक्षम आहे. त्यामुळे या कारखान्यालादेखील पहिली उचल ३,५०० रुपये देणे सहज शक्य आहे, असा दावा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केला. या कारखान्याने सन २०२५-२६ या गळीत हंगामासाठी ३,३०० रुपये प्रति मेट्रिक टन पहिली उचल जाहीर केली आहे. हा दर अपुरा असल्याचे काकडे यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांतील एफआरपी विलंबामुळे सभासदांना मिळणारे ६ कोटी ते ६.५ कोटी रुपये व्याज मिळावे यासाठी चालू लढ्याची अंतिम तारीख ८ डिसेंबर असून, त्याबाबतच्या नोटिसा या कारखाना व शासनाला देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
सतीश काकडे म्हणाले की, सोमेश्वर कारखान्याची तुलना साखरवाडीसारख्या खासगी कारखान्याशी करणे योग्य नाही. साखर कारखान्याने ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असल्याचा नियम गेली चार वर्षे हा नियम पाळलेला नाही. सभासदांचे कोट्यवधी रुपये बिनव्याजी २ ते ३ महिने अडकवले जातात. कारखान्याच्या अध्यक्षांनी साखरेच्या उचल दराबाबत दिशाभूल केली आहे. बँक ३,६०० रुपये देत असताना ते २,८९० रुपये मिळत असल्याचे सांगतात. सध्याचा बाजारभाव ३,७२५ रुपये क्विटल आहे. गेल्यावर्षी कारखान्याला सुमारे १२.५ कोटी रुपये अतिरिक्त मिळाले, असा दावाही काकडे यांनी केला.


















