पुणे : सोमेश्वर कारखान्याने नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात ३,१६३ रुपये एफआरपी सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. परंतु, हंगाम संपून दीड महिना झाला तरी खोडकी बिल दिलेले नाही. या खोडकी बिलाचे पहिला हप्ता १०० रुपये आणि दुसरा हप्ता २०० रुपये असे ३०० रुपये तत्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे. माळेगाव कारखान्याने २०० रुपये प्रतिटन खोडकी ऊस बिल जाहीर केले आहे. त्या कारखान्यापेक्षा ‘सोमेश्वर’ कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे तातडीने सभासद शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी काकडे यांनी केली.
काकडे म्हणाले की, कारखान्याने मागील काही वर्षांपासून खोडकी बिल देणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी कृती समितीस खोडकी व दुसऱ्या हप्त्याची मागणी करावी लागत आहे. सभासद शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे, उसाची लागणी करणे, खते घेणे तसेच मुला-मुलींचा प्रवेश घेणे यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने कारखान्याने सभासदांचा विचार करून दि. ३१ मेपर्यंत ही रक्कम द्यावी. संचालक मंडळाने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा; अन्यथा कृती समितीकडून कारखान्यावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा काकडे यांनी दिला. मागितल्याशिवाय द्यायचं नाही, हे कारखान्याचे धोरण असल्याचे दिसते. कारखान्याने उसाची एफआरपी विलंबाने दिली आहे. त्यावर मिळणाऱ्या व्याजाची मागणी शेतकरी कृती समिती करणार आहे.