पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने जे शेतकरी किमान साडेचार फूट पट्टा पध्दतीने ऊस लागवड करतील आणि त्याची हार्वेस्टरने तोड करतील त्यांना प्रतिटन पन्नास रूपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने तोडणीच्या यांत्रिकीकरणाकडे ठोस वाटचाल सुरू केली आहे. दरम्यान, यावर्षीचा आडसाली ऊस लागवड हंगाम एक जुलैपासूनच सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. कारखान्याचा आडसाली ऊसलागवड हंगाम १ ते १४ ऑगस्ट निश्चित करण्यात आला. यामध्ये को ८६०३२, फुले २६५ व व्हीएसआय ९८०५ या वाणांच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितले की, ऊसतोड मजुरांची टंचाई, टोळ्यांकडून होणारी फसवणूक या पार्श्वभूमीवर हार्वेस्टर वापराशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक शेतकऱ्याने पट्टा पद्धतीने ऊस करून सहकार्य करावे. २०२६-२७ हंगामात चाळीस ते पन्नास हार्वेस्टरशी करार करणार असून दररोज चार हजार टन म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के ऊस हार्वेस्टरनेच तोडणार आहोत. एक जुलैचा मूहूर्त गाठण्यासाठी २८ फेब्रुवारीपासूनच पन्नास टक्के ऊस हार्वेस्टरने तोडण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी किमान साडेचार फुटांपेक्षा अधिक अंतरावर ऊस लागवड करावी. पट्टापद्धतीने आताच्या २०२५-२६ हंगामात लागवड केलेला ऊस २०२६-२७ हंगामात हार्वेस्टरने तोडल्यास त्याला प्रतिटन पन्नास रूपये अनुदान (ऊस दराव्यतिरिक्त) दिले जाणार आहे.