पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याचा १० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण, आणखी तीन लाख टन गाळप शक्य

पुणे : राज्यातील बहुतांश सहकारी व खासगी साखर कारखाने हंगाम बंद करत असताना पुणे जिल्ह्यात सध्या सोमेश्वरसह माळेगाव, विघ्नहर, भीमाशंकर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत १० लाख ७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून ११ लाख ६४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून ११.५९ टक्के साखर उताऱ्यासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कारखान्याने चालू गाळप हंगामात १० लाख टनांचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार केला. तर कारखाना कार्यक्षेत्रात अजून सुमारे ३ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असून गाळप हंगाम २० मार्चपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यंदाच्या हंगामातही सोमेश्वर कारखान्याने दमदार कामगिरीची नोंद केली आहे. एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची परंपराही कारखान्याने कायम राखल्यामुळे सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सोमेश्वर कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता, ऊस तोडणीचे नियोजन, प्रशासन व संचालक मंडळाची तत्परतेमुळे दररोज नऊ हजार मेट्रिक टनांहून अधिक क्षमतेने गाळप सुरू आहे. यंदा कारखान्याचे गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाले. कारखान्याने १०७ दिवसांचा गाळप कालावधी पूर्ण केला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात गाळपासाठी येणाऱ्या उसाला विशेष अनुदान जाहीर करण्यात आल्याने सभासद शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. यंदा एकूण गाळप १३ लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याची शक्यता आहे. कारखान्याचे गाळप मार्चअखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. उशिरा गाळपास जाणाऱ्या उसाला अनुदान देणार असले तरी उसात घट येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here