पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांच्या शालाबाह्य मुलांसाठी साखर शाळा सुरू करण्यात आली आहे. चालू गळीत हंगामात जवळपास पाचशेपेक्षा जास्त कुटुंबे त्यांच्या राहत्या गावापासून स्थलांतरित होऊन कारखाना परिसरामध्ये स्थायिक झाली आहेत. ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी कारखान्याच्या पक्क्या इमारतीमध्ये गेली नऊ-दहा वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेठाणच्या नियंत्रणाखाली साखर शाळा भरत आहे.
पाटेठाण शाळेचे मुख्याध्यापक कुंभार वेळोवेळी शाळेला भेट देवून मार्गदर्शन करतात. याबाबत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत म्हणाले कि, ऊसतोड मजुरांच्या शिक्षण घ्यावे यासाठी कारखाना व्यवस्थापन नेहमीच प्रयत्नशील असून गेल्या चार वर्षांपासून ऊसतोडी व वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी शिक्रापूर येथे वसतिगृहही चालविण्यात येत आहे. याचबरोबर स्वच्छ भारत अभियान, शेतकरी परिसंवाद, आरोग्य शिबिरे अशा प्रकारचे उपक्रम कारखान्यामार्फत राबविले जात आहेत. कारखान्याचा गाळप हंगाम चालू झाल्यापासून ऊस तोडणी मजुरांसाठी दोन आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. यावर्षी ६२ मुले, २७ मुली असे एकूण ८९ विद्यार्थी साखर शाळेत शिक्षण घेत आहेत.


















