पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात एकरी १०० टनांहून अधिक उस उत्पादन मिळविण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रीयदृष्ट्या व परवडणारी ऊस शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेतीसाठी करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता कारखान्याने सात कर्मचाऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे पाठवले आहे. कारखाना यंदा नऊ लाख टन ऊस गाळप करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली. पाटेठाण येथे कारखान्याचा २२ वा मिल रोलर पूजन कार्यक्रम संचालक भगवान मेमाणे यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्ष राऊत बोलत होते.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी सांगितले की, कारखान्यात मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे अंतिम टप्प्यात आली असून सर्व दृष्टीने प्लॅन्ट वेळेत तयार होऊन येता हंगाम शासनाच्या धोरणानुसार सुरू होईल. कारखान्याकडे १२,५३१ हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीची नोंद आहे. कारखान्याने टायर बैलगाडी, ट्रॅक्टर टायरगाडी, वाहन टोळ्या व हार्वेस्टर अशा ऊस तोडणी यंत्रणेचे करार केलेले आहेत. पुढील ऊस गळीत हंगाम २०२६ २७ साठी ऊस लागवडीच्या नोंदी मोबाईल अॅपद्वारे सुरू आहेत. यावेळी उपाध्यक्ष योगेश ससाणे, संचालक किसन शिंदे ज्ञानदेव कदम, जनरल मॅनेजर आर. एन. यादव, चीफ इंजिनिअर एन.ए. भुजबळ, केन मैनेजर एस.बी. टिळेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, कारखान्याचे ऊस व्यवस्थापकीय अधिकारी ए. बी. टिळेकर यांना भारतीय शुगर्सच्यावतीने सर्वोत्कृष्ट मुख्य शेतकी अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.