पुणे : राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाविरोधात शेतकरी संघर्ष समितीचे खासदार शरद पवार यांना निवेदन

पुणे : शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी प्रस्तावित पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग (क्रमांक ११) आणि राजुरी येथील इथेनॉल प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे बाळासाहेब औटी, हनुमान देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर औटी यांसह अनेक शेतकरी प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर लक्ष घालून मार्ग काढण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

शेतकऱ्यांनी जुन्नर शुगर लिमिटेड, राजुरीच्या प्रस्तावित इथेनॉल प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. दीपक औटी यांनी सांगितले की, हा प्रस्तावित कारखाना वनक्षेत्राजवळ असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होईल, तसेच शैक्षणिक व धार्मिक स्थळे बाधित होतील. तर नवीन महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन आणि बेरोजगार बनून विस्थापित होतील. तसेच, यामुळे वनक्षेत्रातील पर्यावरणाला आणि जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. अस्तित्वात असलेल्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० मुळे नवीन द्रुतगती महामार्गाची गरज नाही असेही मत शेतकऱ्यांनी मांडले. यावेळी पवार यांनी पुणे-नाशिक महामार्ग आणि राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाच्या बाबतीत मी स्वतः लक्ष घालून योग्य तो मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here