पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटच्या दिवशी दोन पॅनेल जाहीर झाले आहेत. आता या दोन पॅनलमध्ये कारखान्याच्या निवडणुकीची सरळ लढत होणार आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याची २ मे ही अंतिम तारीख होती. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली श्री जय भवानीमाता पॅनेल जाहीर झाले. दुसरीकडे अविनाश घोलप आणि तानाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी कारखान्याची निवडणूक होत असून, दोन पॅनलमधून ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत. काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची माघार…
श्री छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभा राहत असताना जिजामाता पॅनेलचे सुनील काळे व भारतीय जनता पार्टीचे तानाजीराव थोरात यांनी घोलप यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. श्री जय भवानीमाता पॅनल शुक्रवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर अविनाश घोलप यांनी पॅनेल उभा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. श्री जय भवानीमाता पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेल्या अनेक नाराज इच्छुकांना बरोबर घेऊन तसेच सुनील काळे व तानाजीराव थोरात यांना बरोबर घेऊन घोलप यांनी पॅनेल उभा करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीमध्ये सुमारे २२ हजार सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
…ही आहे शरद पवारांच्या पक्षाची भूमिका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी बारामतीत पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत, आमचा पक्ष या निवडणुकीत ‘तटस्थ’ राहणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, आमचे कोणतेही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते निवडणुकीत सहभागी होणार नाहीत. आम्ही कोणाच्या बाजूने अथवा विरोधात प्रचार देखील करणार नाही. ते म्हणाले, मतदानावेळी मात्र आम्ही सदसद्विवेकबुद्धीला स्मरून योग्य उमेदवारांना मतदान करू, कारखानाहितासाठी आम्ही जाचक यांना पाठिंबा दिला होता. खा. सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांनीही जाचक यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला होता. परंतु, त्या पॅनेलमध्ये आमच्या पक्षाला संधी दिली गेली नाही किंवा यादी तयार करताना विश्वासात देखील घेतले नाही. आम्हाला स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
पवार-जाचक यांचे सूर जुळले…
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अनेक राजकीय घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचे सूर जुळले असून, त्यांनी सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनेल जाहीर केले आहे. सर्वपक्षीय पॅनेल जाहीर करण्यासाठी मागील तीन-चार दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरू होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये पॅनेलच्या जागावाटपावरून राजकीय नाट्य सुरू होते. गुरुवारी संध्याकाळी पवार, भरणे आणि जाचक यांची बैठक झाल्यानंतर पॅनेलच्या जागा निश्चित करण्यात आल्या व शुक्रवारी सकाळी १० वाजता श्री जय भवानीमाता पॅनेल जाहीर करण्यात आले.
२१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात…
निवडणुकीमध्ये २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील ११५ अर्ज अवैध ठरले. ४८५ अर्ज वैध होते. शुक्रवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या मुदतीअखेर ४४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. १८ मे रोजी मतदान होणार असून, २० मे रोजी निवडणुकीचा निकाल आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या सर्वपक्षीय पॅनेलचे २१ उमेदवार आहेत. तर, छत्रपतीचे माजी संचालक तानाजी थोरात प्रमुख असलेल्या छत्रपती बचाव पॅनेलने १६ जागांवरती उमेदवार उभे केले आहेत. आठ इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांमध्ये संजय निंबाळकर, प्रताप पवार, संग्राम निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, करणसिंह घोलप, तानाजी थोरात, राजेंद्रकुमार पाटील, बाबासाहेब झगडे, रवींद्र टकले, नितीन काटे, सत्यजित सपकळ, बाळासाहेब ऊर्फ भाऊसाहेब कांबळे, सिता जामदार, पद्मजा भोसले, संदीप बनकर, तुकाराम काळे यांचा समावेश आहे.