पुणे : दौंड तालुक्यामध्ये सर्वात प्रथम शेतीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणाऱ्या खुटबाव येथील महेंद्र थोरात यांच्या ऊस शेतीतील प्रयोग विद्यार्थ्यांनी अनुभवला. संतराज कॉम्प्युटर्सतर्फे संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या ५१ विद्यार्थ्यांसाठी शिवारफेरी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘एआय’चे तांत्रिक फायदे जाणून घेतले. शेतकरी महेंद्र थोरात यांनी ‘एआय’च्या वापराची माहिती दिली. ते म्हणाले की, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या संकल्पनेतून कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी हा प्रकल्प राबवला आहे. नऊ महिन्यांपूर्वी १० हजार रुपये खर्चून माझ्या शेतीमध्ये ‘एआय’चे युनिट बसवले होते. या प्रणालीचे तांत्रिक फायदे भरपूर आहेत. या प्रणालीमुळे वेळ, पैसा, खते, पाणी, श्रम, औषधे यांची बचत होते. यावेळी थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
दौंड तालुका आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर म्हणाले की, सध्या भारनियमनामुळे ऊस पीक जळताना अनुभवयास येते. परंतु हे तंत्रज्ञान वापरल्याने ऊस हिरवागार राहतो. तंत्रज्ञानामध्ये उसाला फक्त आठवड्यातून दोनदाच प्रत्येकी दोन तास पाण्याची गरज असते. या तंत्रज्ञानामुळे कमी आकाराच्या शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो. बदलत्या काळानुसार हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने अवगत करणे गरजेचे आहे. उसाला कीड लागल्यास मोबाईलवर अलर्ट दिला जातो. उसाला किती लिटर पाणी द्यावे? किती तास चालवावे? पावसाची शक्यता, औषधे फवारणी व त्याचे प्रमाण याची माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळते. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.