पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीस विरोध असून, साखर आयुक्तालयाने त्यासाठी ‘ना हरकत’ दाखला देऊ नये, अशी मागणी यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.
यशवंत कारखान्याच्या सभासदांना विश्वासात न घेता जमीन विक्रीची मनमानी प्रक्रिया चालू आहे. आमचा या प्रक्रियेस तीव्र विरोध असून, त्यांच्या गैरकारभाराची सहकार कायद्यान्वये चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. साखर आयुक्तालयात सोमवारी (दि. ४) लवांडे यांच्यासह पांडुरंग काळे, लोकेश कानकाटे, सागर गोते, अलंकार कांचन, राजेंद्र चौधरी आदींच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेतली. तसेच कारखान्याची सद्यः स्थिती आणि मुंबई उच्च न्यायालयाची प्रत निवेदनाबरोबर दिली. निवेदनावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन साखर आयुक्त सालीमठ यांनी शिष्टमंडळास दिले.
निवेदनात म्हटले आहे की, यशंवत कारखान्याप्रश्नी पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक व २०११ पासूनच्या कारखान्यावरील प्रशासकांनी अतिशय बेजबाबदारपणा दाखवून कामकाजात कर्तव्यकसुरी केलेली आहे. कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेबाबत कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या नुकसानीस त्या त्या काळातील कर्तव्य कसुरी करणारे प्रशासक, अवसायक व विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी. कारखान्याचे शासकीय लेखापरीक्षण संशयास्पद वाटत असून, त्याची शास्त्रशुद्ध पडताळणी तज्ज्ञांमार्फत करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.