पुणे : साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदली

पुणे : साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदलीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. तेथील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी विकास पानसरे यांच्या बदलीने रिक्त जागी ही बदली करण्यात आल्याचे आयुक्तालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, साखर आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे दिला आहे. दैनिक ‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. राज्याचे साखर आयुक्त पदावर तीन वर्षे पूर्ण कार्यकाळ होण्यापुर्वीच भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुर्वीचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांचीही बदली अचानकपणे झाली. तशीच सालिमठ यांचीही बदली अचानक झालेली आहे.

आगामी ऊस गाळप हंगाम 2025–26 च्या तयारीमध्ये साखर आयुक्तालय सध्या व्यस्त आहे. आगामी वर्षात विक्रमी ऊस गाळप होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकही लवकरच अपेक्षित आहे. त्यानंतर हंगामाचे धोरण निश्चित होणार आहे. दरम्यान, साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांनी गतवर्ष हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना वेळेत उसाची एफआरपी देण्यासाठी ठोस भूमिका घेतली. जवळपास २८ कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) त्यांनी जप्ती आदेश काढले. त्यामुळे देय एफआरपीची ९८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकली. मात्र, साखर आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे राजकीय नेत्यांच्या असलेल्या साखर कारखान्यांना दणका बसला आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here