पुणे : साखर कारखानदारीमध्ये ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणीतील समस्या व निवारण या विषयांवर स्थापन करण्यात आलेल्या शुगर टास्क फोर्सची नुकतीच बैठक झाली. साखर उद्योगातील तज्ज्ञ, कार्यकारी संचालक, शेतकरी नेते, अभ्यासक, शास्त्रज्ञ व ऊस तोडणी कामगार नेते यावेळी उपस्थित होते. साखरेला औद्योगिक व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याबरोबरच गुजरातमधील साखर उद्योगाच्या उपपदार्थ प्रकल्पांची पाहणी करण्याचा निर्णय शुगर टास्क फोर्सने यावेळी घेतला. टास्क फोर्सच्या कामाचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी आढावा घेतला.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, टास्क फोर्स कोअर कमिटीचे समन्वयक सतीश देशमुख यांनी, एक हार्वेस्टर किमान दोनशे तोडणी कामगारांचा रोजगार हिरावून घेत असल्याचे सांगितले. तर ऊसतोडणी मजुरांचे अभ्यासक सोमीनाथ घोळवे यांनी मजुरांचे विविध प्रश्न मांडले. ऊसतोड यंत्र उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी महेश सूळ यांनी यांत्रिकीकरणाचे फायदे व तोटे सांगितले. कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. दीपक गायकवाड यांनी मध्यस्थ कमी करण्याची सूचना केली. ऊसतोड कामगार व मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे-पाटील, शेतकरी प्रतिनिधी रावसाहेब ऐतवडे, ‘आंदोलन अंकुश’चे दीपक पाटील आदींनी तोडणी मजूर व हार्वेस्टरविषयक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत कार्यकारी संचालक तात्यासाहेब निकम, इन्स्टिट्यूट ऑफ शुगर टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील, माजी कार्यकारी संचालक अनंत निकम, नंदकुमार सुतार, ‘डीएसटीए’चे डॉ. दशरथ ठवाळ, सरव्यवस्थापक रोहिदास यादव व भारत तावरे, साहेबराव खामकर, सीमा नरोडे, दिलीप वारे, बाळ भिंगारकर, राहुल माने, संतोष पांगरकर आदींही भाग घेतला.