पुणे : खेड तालुक्यातील मरकळ येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या शेतातील वस्तीवर गुरुवारी सकाळी बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ऊस तोडणी मजुरांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या कामगारांना खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी मतांचा विचार न करता तत्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांना आर्थिक मदत देण्यात आली. सभापती स्वतः कामगारांच्या वस्तीवर पोहोचले, बिबट्याने केलेल्या हल्ल्याची पाहणी केली, नुकसानीची माहिती घेतली आणि भयभीत कामगारांना धीर दिला.
चाळीसगाव (जि. जळगाव) येथून हे ऊस तोडणी मजूर मरकळ परिसरात आले आहेत. त्यांना सभापती शिंदे-पाटील यांनी मदत देऊ केली. अलिकडे राजकारणात अनेकदा मतांचा विचार करूनच लोकप्रतिनिधी काम करतात, असे चित्र दिसते. मात्र, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेतून तालुक्याबाहेरील ऊसतोड कामगारांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

















