पुणे : यापूर्वी इंदापूर तालुक्यात चार मोठे साखर कारखाने असतानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी शेजारील जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस द्यावा लागत होता. परंतु यंदा चित्र वेगळे दिसू लागले आहे. सध्या तालुक्यात कर्मयोगी सहकारी (ओंकार ग्रुप), छत्रपती सहकारी, नीरा भीमा, बारामती ॲग्रो हे चार कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. तर तालुक्यातील उसावर अवलंबून असलेले दौंड शुगर्स, अंबालिका शुगर्स, माळेगाव सहकारी, भीमा पाटस, शंकरराव मोहिते कारखाना अकलूज, ओंकार ग्रुप चांदपुरी, विठ्ठलराव शिंदे सहकारी, सद्गुरू श्री श्री साखर कारखाना राजेवाडी, स्वराज या कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
इंदापूर तालुक्यात यंदाच्या साखर हंगामात ऊस गाळपासाठी मोठी स्पर्धा असल्याचे चित्र दिसू लागले आहे. एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार असल्याने गावोगावी तोडणी कामगार दाखल झाले आहेत. कर्मयोगी सहकारी साखर कारखाना ओंकार ग्रुपने चालविण्यास घेतल्याने व हा समूह देत असलेला सर्वाधिक दर यामुळे सभासदांमध्ये पुन्हा कर्मयोगीला ऊस गाळपासाठी देण्याचा ओढा निर्माण झाला आहे. छत्रपती साखर कारखान्याची सूत्रे चेअरमन पृथ्वीराज जाचक नियोजनबद्ध पद्धतीने हाताळत आहेत. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांचा ऊस इतर खासगी कारखान्यांना मिळणार नाही अशी स्थिती आहे. मध्यंतरीच्या काळात साखर कारखान्यांचे गैरव्यवस्थापन, ऊस तोडण्यासाठी कामगार, ट्रॅक्टरचालकांना द्यावे लागणारे पैसे यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळू लागले. अनेकांनी ऊस लागवडीला फाटा देऊन केळीची लागवडी केल्याने उसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे. आता तालुक्यातील दोन कारखाने सक्षम झाल्याचा फटका बारामती ॲग्रो, दौंड शुगर्सवर होऊ शकतो.












