पुणे : पुणे जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास पंचवीस दिवस झाले तरी साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही. राज्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांच्या आंदोलनांमुळे एकरकमी एफआरपीच्या सूत्रानुसार साडेतीन हजार रुपये प्रतिटनांच्या आसपास पहिली उचल दिली जात आहे. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात मात्र ऊसदराची कोंडी फुटत नव्हती. आता येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिल्या हप्त्याची कोंडी सर्वप्रथम फोडली आहे. एफआरपीपेक्षा १५ रुपये प्रती टन जादा देत एकूण ३३०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाने मंगळवारी जाहीर केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सोमेश्वर कारखान्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वाधिक पहिली उचल ठरली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने एकरकमी ३३०० रुपयांप्रमाणे पहिली उचल अदा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. जगताप म्हणाले की, गेल्या हंगामातील चांगल्या साखर उताऱ्यामुळे कारखान्याची जिल्ह्यात ३,२८५ रुपये प्रती टन इतकी सर्वाधिक एफआरपी आहे. आता कारखान्याने एफआरपीपेक्षा पंधरा रुपये अधिकचे दिले आहेत. आगामी दोन ते तीन दिवसांत १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीतील उसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले जातील. कारखान्याचा ताळेबंद स्वच्छ आहे. त्यामुळे मोठी उचल देता येणार आहे. यंदा १४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. त्यानंतर अंतिम ऊस दरही उच्चांकी देण्याची परंपरा राखणार आहोत.


















