पुणे : दौड तालुक्यातील उसाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील राहू बेट परिसरात यंदाच्या हंगामात गुऱ्हाळघरांवर गूळनिर्मितीसाठी उसाची मागणी वाढली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांकडे गाळपासाठी दिलेल्या उसाला सध्या २८०० ते ३१०० रुपये प्रतिटन दर मिळत आहे. मात्र, साखर कारखान्यांच्या ऊस दराच्या तुलनेत खासगी गुऱ्हाळघरांनी दर देण्यात आघाडी घेतली आहे. गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपयांपर्यंत दर देण्यात आला आहे. गुढीपाडव्यापर्यंत उसाचा दर प्रतिटन ४५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सध्या गुळाचा दर ३ हजार रुपये प्रति क्विंटल सुरू होत असून तो ३७०० रुपयांपर्यंत जातो. उन्हाची तीव्रता वाढल्याने गुळाचा उताराही चांगला मिळत आहे, असे गुऱ्हाळ चालकांनी दैनिक ‘लोकमत’ला सांगितले.
आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा उच्चांकी दर मिळाल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. सध्या गुळाचा बाजारभाव प्रतिक्विंटल ३ हजार ते ३७०० रुपयांदरम्यान असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने गुळाचा उताराही चांगला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने अद्याप चालू हंगामासाठी अंतिम दर जाहीर केलेला नाही. आणि गुऱ्हाळघरांकडून चांगला दर दिला जात असल्याने शेतकरी गुऱ्हाळांकडे ऊस पाठविण्यास प्राधान्य देत आहेत. कारखान्यांच्या तुलनेत गुऱ्हाळघरांवर दर चांगला मिळतो, पैसेही लवकर मिळतात आणि कमी कालावधीत गाळप पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा, गहू आदी पिकांची लागवड वेळेत करता येते, असेही शेतकरी सांगतात.


















