पुणे : बारामती तालुक्यातील दि माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकांसाठी २२ जून रोजी मतदान होत आहे. मंगळवार, दिनांक २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी दि. १५ रोजी या कार्यक्रमाची घोषणा केली. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती करण्याची विनंती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे. कारखान्याची प्रारुप मतदार यादी २० जानेवारी २०२५ आणि अंतिम मतदार यादी ही १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिध्द केलेली आहे.
प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार, उमेदवारांचे अर्ज २१ मे पासून स्वीकारले जाणार आहेत. मंजूर केलेल्या निवडणूक उमेदवारी अर्जांची छाननी २८ मे रोजी कार्यक्रमात म्हटले आहे. वैध उमेदवारी अर्जांची नांवे २९ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जातील. उमेदवारी अर्ज माघारीस २९ मे पासून सुरुवात होईल. तर अर्ज माघारीचा अंतिम दिवस १२ जून आहे. पात्र उमेदवारांची यादी १३ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्द केली जाईल व त्याच दिवशी उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्हांचे) वाटप करण्यात येईल. २२ जून रोजी मतदान होईल. तर २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे आता कार्यक्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.