पुणे : निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने माळेगाव कारखाना अध्यक्षपदाची निवड लांबणीवर

पुणे : निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलाविण्यात आलेली संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक रविवारी (ता. १) ऐनवेळी तहकूब करण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी ही माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अध्यक्षपद गेल्या महिन्याभरापासून रिक्त आहे. या कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून, पुढील बैठकीत अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडेच सोपविण्यात येणार असल्याचे संकेत संचालक मंडळाकडून देण्यात आले. त्यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नवीन अध्यक्ष निवडीसाठी रविवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रांताधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कारखाना प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया राबविता आली नाही. अध्यक्ष निवडीबाबत पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक पाटील यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रथमच संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदारसंघातून संचालिका म्हणून निवडून आल्या आहेत. त्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित होत्या. यावेळी कार्यकारी संचालक पाटील व संचालकांनी कारखान्याच्या सद्यःस्थितीची माहिती सादर केली. उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष जगताप हेही यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here