पुणे : देलवडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब शेलार यांनी शालेय जीवनामध्ये ऊस तोडणी व उसाची लागण करत शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत कनिष्ठ अभियंतापद मिळवले. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्यांनी आता पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंतापदावर मजल मारली आहे. आई वत्सला व वडील श्रीरंग यांनी ऊस तोडणी व मजुरीची कामे करत भाऊसाहेब यांना शिक्षण दिले. त्यांना साथ देण्यासाठी उसाची लागण करणे, ऊस तोडणी व मिळेल ती रोजंदारीची कामे त्यांनी केली. शेलार यांच्या कुटुंबामध्ये १५ अभियंते आहेत. विशेष म्हणजे ३५०० लोकसंख्या असणाऱ्या देलवडी गावामध्ये १८९ अभियंते आहेत. यापैकी अनेक अभियंत्यांनी आपले कर्तृत्व सातासमुद्रापार नेले आहे. भाऊसाहेब यांच्यासह जुन्याजाणत्या अभियंत्यांमुळे ही किमया घडली आहे.
भाऊसाहेब यांचे प्राथमिक शिक्षण देलवडी येथे झाले. घरापासून आठ किलोमीटर चालत नाथाची वाडी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बारामती येथे राधेश्याम अग्रवाल कॉलेजला सायन्स टेक्निकल महाविद्यालयात प्रवेश घेतला. माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळातून सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला. पहिली खासगी नोकरी करताना नर्मदा सरोवर धरणाच्या कालवा डिझाईनचे काम पूर्ण करून घेत २० अभियंत्यांच्या पथाचे नेतृत्व केले. हे करताना पुणे महानगरपालिकेमध्ये अभियंता म्हणून नोकरी मिळाली. पदोन्नतीसाठी वयाच्या चाळीशीमध्ये त्यांनी अभियंता पदवीचे शिक्षण घेतले. पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये लोकार्पण केलेली २८५८ घरकुले बांधणे हा प्रकल्प शेलार यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. आता लवकरच त्यांना अधीक्षक अभियंतापद मिळणार आहे.