पुणे : जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. मात्र, मे महिन्यामध्येच वळवाचा पाऊस जोरदार पडत असल्याने अनेक ठिकाणी हुमणीचे भुंगेरे दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना लवकरच कडुनिंब, बोर, बाभळी यांसारख्या झाडाशेजारी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट करा. किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवा, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
खरीप हंगामात हुमणी अळीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होते. शाश्वत पाणीपुरवठ्याच्या जमिनीत घेतल्या जाणऱ्याया पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. भंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हाणीकारक आहे. त्यामुळे पीक वाळून जाते.
जास्त प्रदुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीक नाश पावते. वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, कडुनिंब, बोर या झाडांवर गोळा होतात. अगोदर मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. त्यापाठोपाठ नर भुंगेरे बाहेर पडतात. झाडांवर पाने खाण्यासाठी भुंगे गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेरे नष्ट होतात.