पुणे: शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने विनाकपात प्रति टन ३,१०१ रुपयांप्रमाणे हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सोमवारी वर्ग केला आहे. कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. चालू गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या दि. १६ ते ३० नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्याचा ऊस बिलाचा पहिला विनाकपात हप्ता जमा केला आहे. यापूर्वी १ ते १५ नोव्हेंबर या पंधरवड्यातील ऊस बिलाची रक्कम बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.
कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी सांगीतले की, गळीत हंगामामध्ये ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या पंधरवड्याची ऊसबिल रक्कम देखील सोमवारी बँकेत वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ आदी उपस्थित होते.

















