पुणे : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील पुष्पा अमोल कोरडे यांनी राबविलेला ऊसपाचट व्यवस्थापनाचा उपक्रम आता राज्यस्तरावर अनुकरणीय मॉडेल म्हणून समोर येत आहे. कोरडे यांनी पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर गेल्या तीन वर्षांत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पाचट संकलनाची भक्कम पुरवठा साखळी निर्माण केली आहे. पुणे येथील बायोफ्यूल सर्कल कंपनीच्या माध्यमातून बोरी येथे ‘बायोमास बँक’ सुरू करण्यात आली असून, दररोज ६० ते १०० टन पाचट शेतातून संकलित केले जाते. या कामातून १५ ट्रॅक्टर चालक-मालकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. या उपक्रमामुळे टाकाऊ समजल्या जाणाऱ्या पाचटापासून शेतकऱ्यांना आता थेट आर्थिक लाभ मिळत आहे.
जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित पुष्पा कोरडे या जुन्नर तालुक्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट देखील आहेत. कोरडे यांनी २०२२ मध्ये राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून राऊंड बेलर खरेदी करून ऊस पाचट संकलनाचा श्रीगणेशा केला. या प्रकल्पासाठी कृषी संचालक विनयकुमार आवटे यांसह अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. पाचट जाळण्यामुळे होणारे प्रदूषण टाळून त्यातून उत्पन्न आणि रोजगार निर्मितीचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. राऊंड बेलरच्या सहाय्याने पाचटाच्या १५० ते ३०० किलोच्या गाठी तयार केल्या जातात. या गाठींचा उपयोग बायोमास ब्रिकेट, सेंद्रिय खत आणि बायोचार निर्मितीसाठी केला जातो.
















