पुणे : राज्य सहकारी बँकेच्या सर्व कर्जाची परतफेड केल्यामुळे हवेली तालुक्यातील थेऊर येथील चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर राज्य बँकेचे प्राधिकृत अधिकारी विनायक आंगणे, कायदा विभागाचे व्यवस्थापक अमित डी. जोशी, लिगल अधिकारी विनायक किटे उपस्थित होते. सन २०१०-११ पासून बंद असलेला कारखाना आता सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात आल्याने पुन्हा चालू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचालक मंडळ व सभासदांनी नवीन अत्याधुनिक शुगर प्लांट, डिस्टीलरी प्लांट आणि सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करून कारखान्याचा भूतपूर्व वैभव पुनर्संचयित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती देताना कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, ३१ ऑगस्ट २०२५ अखेर कारखान्याचे कर्ज ५,४८५.२६ लाख रुपये होते. एकरकमी परतफेड योजनेंतर्गत रुपये ३,०४४.४४ लाखांची सूट घेऊन २४४०.८२ लाख रुपये भरावे लागले. ३० सप्टेंबर २०२५ रोजी त्याचा भरणा करण्यात आला. याशिवाय, संचालक मंडळाने बँक ऑफ इंडियाचे (थेऊर शाखा) १.३० कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे (उरुळी कांचन शाखा) ७.१० कोटी आणि बँक ऑफ बरोडाचे (कुंजीरवाडी शाखा) ३.७५ कोटी रुपये थकीत कर्ज भरणा करून कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त केला आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक, कार्यकारी संचालक कैलास जरे, पंच बळीराम गावडे व संजय भोरडे उपस्थित होते.

















