पुणे : यंदाच्या वर्षी उसाला सर्वत्र तुरे आल्यामुळे उसाच्या वजनावर परिणाम होऊन सर्वच साखर कारखाने लवकर बंद झाले. यासह ऊस लागवडीचे क्षेत्र कमी होऊ लागल्यामुळे साखर कारखान्यांची चिंता वाढलेली आहे. पुढील गळीत हंगाम सुरू होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी असल्यामुळे या मधल्या काळात गळीत हंगामासाठी उसाच्या लागवडीसाठी खास प्रयत्न करावे लागणार आहेत. यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखाने ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाहीत. उसाच्या पळवापळवीबरोबरच उसाला तुरे जास्त आल्यामुळे आणि उसाचे वजन घटल्याने साखर कारखाने देखील लवकर बंद झाले आहेत. यंदाच्या वर्षी साखरेच्या उताऱ्यावर देखील परिणाम झाला आहे. एकंदरीत, यंदाचा गळीत हंगाम साखर कारखानदारांबरोबरच ऊस उत्पादकांना देखील तोट्यात गेला आहे.
पुढील वर्षी सर्वच साखर कारखान्यांना उसाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासणार आहे. आडसाली व पूर्वहंगामी या उसाची देखील लागवड कमी झाली आहे. सध्या सुरू ऊस लागवडीचा हंगाम चालू असला तरी उन्हाची तीव्रता असल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड जरी केली तरी उसाच्या उगवणीवर उन्हाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सुरू उसाची देखील लागवड कमी होत आहे. खोडवा ऊस काढून टाकण्याचे प्रमाण शेतकरीवर्गाचे जास्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी उसाची कमतरता भरून काढण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्या लागण्याची शक्यता आहे.
विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, यंदाच्या गळीत हंगामामध्ये उसाचे एकरी उत्पन्न अवघे ४० ते ४२ टन आल्याने गळीत हंगाम लवकर आटोपता घ्यावा लागला आहे, तसेच यंदाच्या हंगामाचे उद्दिष्ट देखील सर्व साखर कारखाने पूर्ण करू शकले नाहीत. पुढील वर्षी देखील उसाची कमतरता भासणार असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड अधिकची करावी, यासाठी शेतकी विभागाकडून विविध योजना राबविल्या जाणार आहेत. आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसाची लागवड जास्त होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी राखावा, यासाठी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत विनंती केली जाणार आहे. पुढील वर्षी उसाची लागवड जास्त व्हावी, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांसाठी अधिकच्या सवलती देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.


















