पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कारखान्याचे गतवैभव या मुद्द्याभोवती फिरली. सभासदांनी कारखान्याला गतवैभव मिळावे यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानीमाता पॅनेलला सत्तेचा कौल दिला. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री जय भवानीमाता पॅनेलच्या उमेदवारांनी श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांचा धुव्वा उडवला आणि सुमारे पाच ते साडेसहा हजार मताधिक्याने पराभव करून एकहाती सत्ता मिळवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा करून त्यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे कारखाना चालविणार असल्याचे अगोदरच जाहीर सभेमध्ये सांगितले होते. त्यामुळे कारखान्याची एकहाती सत्ता मिळवणे काहीसे सोपे झाले.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. कोणताही उपपदार्थ निर्मिती न करताही कारखाना उच्चांकी दर देत होता. राज्यातील पहिल्या पाच कारखान्यामध्ये छत्रपती कारखान्याचे नाव होते. छत्रपती राज्यातील ऊस दराची कोंडी फोडत असे. छत्रपतीच्या दरानंतर राज्यातील इतर कारखाने दर देत होते. मात्र, मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती अडचणीमध्ये आला. माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेमध्ये छत्रपती कारखाना सभासदांना ५०० ते ६०० रुपये प्रतिटन कमी दर देऊ लागला. कारखान्याची निवडणूक पाच वर्षे रखडली. संचालक मंडळाला दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली असली तरीही सभासदांच्या पदरामध्ये निराशा पडली होती.
छत्रपती अडचणीमध्ये असल्यामुळे सभासद चिंताग्रस्त होते. छत्रपतीची निवडणूक जाहीर झाली व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये युती झाली. पवार-जाचक युती निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरली. अजित पवार यांनी वेळोवेळी जाहीर सभेमध्ये छत्रपती साखर कारखान्याला अडचणीमधून बाहेर काढून गतवैभव मिळवून देणार असल्याचे सांगितले. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही कारखान्याला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सर्वोतपरी मदत करणार असल्याचे सांगितले. पवार यांचे आश्वासन सभासदांना भावले. तसेच पृथ्वीराज जाचक यांना कारखान्याविषयी असणारी तळमळ व कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी असलेल्या चिकाटीने सभासदांची मने जिंकली.