पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये आगामी गाळप हंगाम २०२५-२६ साठी मील रोलरचे पूजन शनिवारी सकाळी १० वाजता सर्व संचालक मंडळ, सदस्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर उपस्थित होते. कारखान्यामध्ये मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. कारखान्याची गाळप क्षमता विस्तारण्यात आली आहे. आता कारखाना ८५०० ते ९००० टन प्रती दिन ऊस गाळप करेल. कारखाना ऑक्टोबर महिन्यामध्ये गाळपासाठी सज्ज होणार असल्याची माहिती अध्यक्ष शेरकर यांनी दिली. उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक मंडळ, सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष शेरकर म्हणाले की, कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५ हजार टनावरुन ७ हजार ५०० टन झाल्याने गाळप हंगाम कारखाना २०२५-२६ पासून प्रतीदिन ८ हजार ५०० ते ९ हजार टन उसाचे गाळप करणार आहे. ऊसगाळप हंगामात कारखान्याचे सुमारे १३ लाख टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट राहणार आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मीती व डिस्टीलरी प्रकल्पांची कामेही वेगामध्ये सुरू आहेत. विघ्नहर कारखान्याचा ६५ केएलपीडी क्षमतेचा महत्वकांक्षी असा डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.