पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. २०) खेळीमेळीच्या वातावरणात झाली. निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी गेल्या हंगामात गाळपासाठी आलेल्या उसास इतर कारखान्यांच्या ऊस दरापेक्षा कमी दर दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. या गळीत हंगामात प्रतिदिनी ८००० ते ८५०० टन गाळप होईल, असे त्यांनी सांगितले. सभेत मागील गाळप हंगामात जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, एकरी १११ आणि १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी, जास्त ऊस तोडणी व वाहतूक करणारे कंत्राटदार, हार्वेस्टरने जास्त ऊस तोडणी करणारे कंत्राटदार यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले. सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी दुखवट्याचा ठराव मांडला. यावेळी शेरेकर यांनी कारखान्याची यंत्रसामग्री ४० वर्षांपूर्वीची असल्याने देखभाल व दुरुस्ती खर्च वाढल्याने विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला, असे सांगत सभासद व ऊस उत्पादकांनी आगामी, २०२५-२६च्या गळीत हंगामात आपला संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. यावेळी माजी खासदार निवृत्तिशेठ शेरकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या वकृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा सत्कार केला. सुनील कवडे, गजानन हाडवळे, अंबादास हांडे, एकनाथ महाराज तांबे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र कबाडी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.