पुणे : जुत्रर तालुक्यातील श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी (दि. ३) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते आणि आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरण कामाबाबत सविस्तर माहिती दिली. सत्यशिल शेरकर यांनी या गळीत हंगामात दररोज आठ हजार टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवल्यामुळे ऊसतोडणी वेळेवर होईल, अशी ग्वाही दिली. तसेच, ऊस वजनाबाबत शंका असल्यास खासगी वजन काट्यावर वजन करण्यास कारखान्याची कोणतीही हरकत राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मागील हंगामात कारखान्याने ऊसाला उच्चांकी ३२५५ रुपये प्रति टन दर दिला होता, तर कामगारांना १७% बोनससह १०% वेतन वाढ लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने साखरेचा आणि इथेनॉलच्या किमान दरात वाढ न केल्याने कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. ऊस हे एकमेव हमीभाव देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांच्या कारखान्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. यावेळी कृषीरत्न अनिल मेहेर (चेअरमन, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव) यांची भारत सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या केंद्रीय सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावर्षी १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.











