पुणे : ‘व्हीएसआय’च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा, श्री सोमेश्वर कारखाना ठरला सर्वोत्कृष्ट

पुणे : साखर उद्योगात चांगली कामगिरी केल्याबद्दल साखर कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये बारामतीच्या (जि. पुणे) सोमेश्वर सहकारी कारखान्याला राज्यस्तरीय कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला. ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी बुधवारी (दि. २४) पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यावेळी पत्रकार परिषदेस साखर अभियांत्रिकीचे विभागप्रमुख राजेंद्र चांदगुडे, मुख्य लेखाधिकारी शिवाजी खेंगरे, मद्यार्क आणि जैवइंधन तंत्रज्ञानाचे विभागप्रमुख डॉ. काकासाहेब कोंडे, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग आदी उपस्थित होते.

मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि पाच लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) ऊस उत्पादनात वाढत्या वापरासंदर्भात पुढील वर्षापासून स्वतंत्र पुरस्कार दिले जाणार आहेत अशी माहिती संभाजी कडू-पाटील यांनी दिली. सोमवारी (ता. २९) ‘व्हीएसआय’ची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांसह मान्यवर उपस्थित राहतील.

संभाजी कडू-पाटील म्हणाले की, कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार शिरोळ-कोल्हापूरच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला तर कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार धाराशिवच्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्री या कारखान्यास जाहीर झाला आहे. कै. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास देऊन गौरव केला जाईल. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार वाळवा-सांगली येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला, कै. राजे विक्रमसिंह घाडगे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार लातूर जिल्ह्यातील विलास सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. यंदा कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार दोन साखर कारखान्यांमध्ये विभागून देण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (कडेगाव- सांगली) आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (कराड-सातारा) यांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here