पुणे : भीमा सहकारी साखर कारखान्यातील पारदर्शकतेसाठी लवकरच संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन करणार असल्याची घोषणा माजी आमदार रमेश थोरात यांनी केली. भीमा पाटस कारखान्याच्या संदर्भात सभासदांनी मागितलेली माहिती देण्यात येत नाही. मी स्वतः कारखान्याचा सभासद असून, लेखी स्वरूपात काही कागदपत्रांची मागणी केली आहे. सहकार कायद्यानुसार ही माहिती ३० दिवसांत देणे बंधनकारक असताना सहा महिने उलटूनही कागदपत्रे मिळालेली नाहीत. हा सहकार कायद्याचा स्पष्ट भंग असून, कारखान्याचे प्रमुख, आमदार राहुल कुल हे स्वतः कायद्याचा अवमान करत आहेत असा आरोप थोरात यांनी केला. काही वर्षापूर्वी कारखान्याच्या गोडावूनमधील सुमारे एक लाख साखर पोती जळाल्याच्या प्रकरणात नेमकी कोणती चौकशी झाली, याचा खुलासा झालेला नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आरोपांना प्रत्युत्तर मा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची हजारो सभासदांच्या साक्षीने उत्तरे देण्यात आली आहेत. तसेच माहिती मागणाऱ्या सभासदांना वेळोवेळी आवश्यक माहिती दिलेली असून, कुणाच्याही हक्कांची पायमल्ली झालेली नाही. भीमा पाटस कारखाना सध्या प्रगतीपथावर असून, कामगारांचे वेतन वेळेवर दिले जात आहे. तसेच कारखान्यावरचे कर्ज हळूहळू कमी होत असल्याचेही राहुल कुल यांनी स्पष्ट केले.
















