पुणे : वाढत्या उन्हामुळे उसाच्या रसाला अधिक पंसती असली तरी रसवंतीचालक ऊस मिळविण्यासाठी भटकंती करीत आहेत. जाग्यावरच ७ हजार रुपये तर रसवंतीवर पोहोच करण्यासाठी ८ हजार रुपये प्रतिटन दर आकारला जात आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उसाच्या रसाची मागणीबरोबरच दरही वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा तीव्रतेने जाणवत आहे. यातून थंडपेयाच्या विक्रीतही वाढ झाली आहे. आता रस्त्यारस्त्यावरपणे सहज मिळणाऱ्या उसाच्या रसाला अधिक मागणी वाढली आहे.
उन्हाच्या तडाख्यात गारवा शोधताना लोकांचा पाणी, उसाचा रस, कोल्ड्रिंक, सरबत, फळे खाण्याकडे लोकांचा ओघ वाढला आहे. यातही उसाच्या रसावर अधिक भर दिला जातो. दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असल्याने दुपारी रस्ते सामसूम होत आहेत. यंदा पावसाळा जोरदार झाला असला तरी मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाचे क्षेत्रही घटले होते. मात्र काही शेतकरी रसवंतीचालकांसाठी ऊस राखून ठेवतात. या राखीव उसाला दरही चांगला मिळतो. सध्या शेतावर ऊस ७ हजार रुपये टन तर रसवंतीवर पोहोच ८ हजार रुपये टनाने ऊस मिळत आहे. हा ऊसही रसवंतीचालकांना भटकंती करून मिळवावा लागत आहे. यामुळे रसाचा ग्लासही महागला आहे. प्रत्येक रसाच्या ग्लाससाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत. यावर्षी उसाचे भाव दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहेत असे यड्राव येथील रसवंतीचालक मल्लाप्पा माळी यांनी सांगितले.